लखनौ-
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. निवडणूक निकालात आपलाच विजय होईल असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. तसं ते ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगत होते. त्यांनीच आता पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. त्यांनी यावेळी पहिल्यांदात एका मुलाखतीत आझमगढ आणि रामपूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली.
अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपाला बेईमान ठरवलं आहे. अखिलेश यादव सध्या २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि अशात त्यांनी भाजपाच्या विजयामागे कसं सरकारी यंत्रणांचा हात आहे हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यास सुरुवात केली आहे. पक्षात भाजपाविरोधी वातावरण धगधगतं राहील याची ते काळजी घेत आहेत. विधानसभा निवडणूक असो की लोकसभेची दोन जागांची पोटनिवडणूक समाजवादी पक्षाच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग आहे. भाजपच्या बेईमानीमुळे पराभव झाला. आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.
संस्थांच्या निष्पक्षपातीपणावर व्यक्त केला संशयसपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही वाचवण्याचं आवाहन करत राज्यातील मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. "आता देशातील कोणतीही संस्था तटस्थ राहिलेली नाही. सरकारकडून दबाव आणून या संस्थांकडून अपेक्षित काम करून घेतले जाते. निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले नाही. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा कार्यकर्त्यांना मतदान करू दिले नाही. आझमगढमध्ये सपा कार्यकर्त्यांविरोधात रेड कार्ड जारी करण्यात आले. निवडणूक आयोग झोपलं होतं का? त्यांनी आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले.