गाझियाबाद-
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर नाम्यांतून विविध घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. गाझियाबादमध्ये आज समाजवादी पक्षाचे नेते आणि आरएलडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपा सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा विकास खुंटला गेला असल्याचा आरोप केला. यामुळेच यूपीच्या जनतेनं यावेळी भाजपा सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय केला आहे. कोरोनाच्या काळात मजुरांना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत त्यासाठी भाजपाच जबाबदार आहे. मोदी सरकारमध्ये अन्नदाता देखील नाराज आहेत आणि ही निवडणूक मजूर व शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे भाजपाला जोरदार प्रत्युत्तर या निवडणुकीत मिळेल, असं अखिलेश यादव म्हणाले. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकीच्यानंतर गुजरातमध्ये निवडणूक होणार आहे आणि भाजपाला खरं सरप्राईज तिथंच मिळणार आहे. गुजरातमध्ये भाजपाचा पराभव निश्चित आहे. कारण भाजपा नकारात्मक राजकारणाचा द्योतक आहे, असंही अखिलेश यादव म्हणाले.
१० रुपयांत समाजवादी थाळी!अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत विविध आश्वासनांसह समाजवादी थाळी लॉन्च करण्याचंही आश्वासन दिलं आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यानंतर १० रुपयांत पोटभर जेवण मिळेस अशी समाजवादी थाळी उपलब्ध करुन देऊ, असं अखिलेश यादव म्हणाले. या थाळीत पौष्टिक आहार असेल. याशिवाय राज्यातील सर्वसामान्य जनतेला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊ. तसंच समाजवादी पेन्शन नावानं नवी योजना सुरू करू, असंही ते म्हणाले.