Yogi Adityanath on Akhilesh Yadav: उत्तर प्रदेशात विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना चांगलेच सुनावलं आहे. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सनातन धर्म हा या देशाचा राष्ट्रधर्म आहे असे आम्ही मानतो. त्याची सुरक्षा ही मानवी सुरक्षिततेची हमी आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. यावेळी क्रिकेटर मोहम्मद शमीनेही महाकुंभात स्नान केल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. यावरुनच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींना टोला लगावला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभावर केलेल्या वक्तव्यांवरून जोरदार वाद सुरू आहे. विरोधकांनी महाकुंभाच्या आयोजनवरुनही उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरलं. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. मात्र यावेळी त्यांनी क्रिकेटपटू मोहम्मद शमी याने सुद्धा महाकुंभात स्नान केल्याचा दावा केला. मुख्यमंत्री योगींनी केलेल्या या विधानावर अखिलेश यादव यांनी टोला लगावला आहे.
मोहम्मद शमीने महाकुंभदरम्यान स्नान केले - योगी आदित्यनाथ
"महाकुंभमध्ये कोणताही भेदभाव नाही. मोहम्मद शमीनेही तेथे डुबकी मारली आहे. वेगवेगळ्या जाती, पंथ आणि धर्माचे लोक, जर ते मनापासून भक्तीभावाने आले असतील तर त्यांनीही पवित्र स्नान केले आहे. जे लोक श्रद्धेची थट्टा करण्यासाठी आले होते त्यांना फटकारले गेले आणि तेथून हाकलून लावले गेले,” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
अखिलेश यादवांवर साधला निशाणा
"आम्हाला या सगळ्याचे वाईट वाटले नाही कारण आम्हाला माहित आहे की बाधित व्यक्तीवर कोणताही उपचार नाही. अखिलेश यादव यांनीही तेथे जाऊन स्नान केले. तुम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या व्यवस्थेचे कौतुक केले. प्रयागराज कुंभबाबत अनेक चुकीच्या माहिती पसरवण्यात आल्या आहेत. आंदोलन करणे ही त्यांची मजबुरी आहे," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टोमणा मारला. आता शमीचे नावही बदलले आहे का?, असा सवाल अखिलेश यादव म्हणाले.