समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी जातनिहाय जनगणनेबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. लोकांना जातीच्या आधारावर समानतेपासून वंचित ठेवून भावनांशी खेळल्याचा गंभीर आरोप भाजपावर केला आहे. बुंदेलखंड प्रदेशातील संरक्षण उद्योगांशी संबंधित भाजपा सरकारच्या घोषणांवर अखिलेश यांनी जोरदार टीका केली आहे.
"बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजलं की भाजपाने मोठी स्वप्नं दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केलं जाईल. आज आम्ही 10 वर्षे मागे वळून पाहतो, तेव्हा ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
अखिलेश यांनी बेरोजगारी आणि शेतकर्यांच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीबद्दल भाजपावर हल्लाबोल केला. अखिलेश यादव फिरोजाबादच्या तुंडला येथील पाल, बघेल आणि धनगर समाज यांच्या विभागीय महापंचायतमध्ये सामील होण्यासाठी आले होते. ते म्हणाले की, आज संपूर्ण देशातील लोक जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आले आहेत. मंडल आयोग तथा संविधानाच्या भावनांशी खेळण्याचं काम भाजपाच्या लोकांनी केलं आहे.
"सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल आणि लोकांना प्रमाणित हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.