लखनऊ - लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचं समीकरण आता बिघडू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये रविवारी मायावतींच्या उपस्थितीत बसपा पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षांतर्गत अनेक फेरबदल करण्यात आले. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.
या बैठकीत मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मायावती 25 मिनिटे बोलल्या. यात मायावती म्हणाल्या की, समाजवादी पक्षाचे काही जण सांगतात, आमच्यामुळे बसपाने 10 जागा जिंकल्या त्यांनी पहिलं स्वत:कडे बघावं. बसपाने साथ दिली म्हणून समाजवादी पक्षाला 5 जागा तरी जिंकता आल्या. पोटनिवडणुकीत आम्हाला हेच दाखवून द्यायचं आहे की जो विजय झाला तो आमच्या बळावर झाला आहे. ज्याचं श्रेय समाजवादी पक्षाचे लोक घेत आहेत.
समाजवादी पक्षाच्या लोकांनी गद्दारी केली. अनेक जागांवर बसपाच्या उमेदवारांना हरविण्याचं काम समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केलं. धार्मिक विभाजनामुळे समाजवादी पार्टी घाबरली होती त्यामुळे निवडणुकीत उघडपणे मुद्दे मांडण्यासाठी ते कमी पडले. माझ्यावर जेवढ्या केसेस आहेत त्या प्रकरणांमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यांचा हात आहे अशी आठवणही मायावती यांनी करुन दिली.
घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे
लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही. पराभवानंतरही अखिलेश यादवकडून एकदाही संपर्क करण्यात आला नाही. सपाच्या नेत्यांनी कोणकोणत्या ठिकाणी बसपाला मदत केली नाही याची माहिती मला त्यांना द्यायची होती. इतकचं नाही तर एकदा अखिलेशने आपल्याला मॅसेज करत मुस्लीम लोकांना जास्त तिकीट देऊ नका त्याने धार्मिक विभाजन होईल असं सांगितले पण मी त्यांचे म्हणणं ऐकलं नाही असा आरोप मायावती यांच्याकडून करण्यात आला आहे.