गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले डॉ. कफील खान हे समाजवादी पार्टीकडून एमएलसी पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. देवरिया-कुशीनगर स्थायी विधान परिषद सदस्याच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांनी डॉ. कफील खान यांना पार्टीचे उमेदवार केले आहे. डॉ. कफील खान यांनी मंगळवारी समाजवादी पार्टीच्या प्रदेश मुख्यालयात अखिलेश यादव यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचे पुस्तक भेट दिले.
समाजवादी पार्टीने डॉ. कफील खान यांच्यासह विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, निवडणुकीचे वातावरण पाहता अनेक आमदारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. डॉ. कफील खान यांनी मंगळवारी दुपारी समाजवादी पार्टीच्या कार्यालयात अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांना भेट म्हणून दिले. पार्टीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांनी डॉ. कफील खान यांना विधान परिषदेचे उमेदवार बनवले आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बीआरडी रुग्णालयात अनेक मुलांचा मृत्यू झाल्यामुळे डॉ. कफील खान चर्चेत आले होते. त्यानंतर मुलांच्या मृत्यूबाबत डॉ. कफील खान यांना जबाबदार धरून राज्य सरकारने त्यांना निलंबित केले होते. तसेच, याप्रकरणी डॉ. कफील खान बराच काळ तुरुंगातही होते.
विधान परिषदेच्या 36 जागांवर निवडणूक होत असून त्यापैकी 35 जागा समाजवादी पार्टीच्या ताब्यात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यातील संघर्षात समाजवादी पार्टीचे 8 आमदार भाजपमध्ये गेले. त्यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या जागांसाठी नव्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. अखिलेश यादव आणि प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल हे गेल्या दोन दिवसांपासून समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात विधान परिषदेच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.
'या' नेत्यांच्या नावाची चर्चासुत्रांच्या माहितीनुसार, सुनील सिंह साजन यांना लखनऊ-उन्नावमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर बस्ती-गोरखपूरमधून संतोष यादव सनी, मथुरा-एटा-कासगंजमधून उदयवीर सिंग, फैजाबाद-आंबेडकर नगरमधून हिरालाल यादव, बाराबंकीमधून राजेश यादव, यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बलियामधून समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष अरविंद गिरी, जौनपूरमधून डॉ. मनोज यादव, श्रावस्ती-बहराइचमधून अमर सिंह आणि आझमगडमधून राकेश गुड्डू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारांची अधिकृत यादी पार्टीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र वरिष्ठ नेतृत्वाने सर्वांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. काही उमेदवार बुधवारी नावनोंदणी करू शकतात.