उत्तर प्रदेश निवडणुकीत आता राजकीय वातावरण तापले आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या डिजिटल फैरी झडू लागल्या आहेत. प्रत्यक्ष सक्षा होत नसल्याने पक्षांना डिजिटली लोकांपर्यंत पोहोचावे लागत आहे. अशातच आज सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही वेळापासून आपले हेलिकॉप्टर दिल्लीतच रोखून धरण्यात आल्याचे अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे.
सपाचे नेते अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते चौधरी जयंत सिंह आजपासून एकत्र प्रचार करणार आहेत. मेरठ, मुजफ्फराबाद असा अखिलेश यादव यांचा दौरा आहे. परंतू दिल्लीच्या विमानतळावर अखिलेश यादव यांचे हेलिकॉप्टर काहीही कारण न देता थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
माझे हेलिकॉप्टर कोणतेही कारण न देता दिल्लीमध्ये रोखून धरण्यात आले आहे. मला मुजफ्फरनगरला जाऊ दिले जात नाहीय. भाजपाचा एक वरिष्ठ नेता आताच इथून रवाना झाला आहे. हरत असलेल्या भाजपाची निराशेने भरलेला कट आहे. जनता सर्व पाहतेय, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.
या ट्विटनंतर अखिलेश यादव यांनी जवळपास ४० मिनिटांनी दुसरे ट्विट करत आता हेलिकॉप्टरद्वारे उड्डाण घेत असल्याचे म्हटले आहे. सत्तेचा दुरुपय़ोग हा हरणाऱ्या लोकांचे चिन्ह आहे, समाजवादी संघर्षाच्या इतिहासात हा दिवस नोंद होईल असे त्यांनी म्हटले आहे.