लखनौ - दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन आता चांगलंच राजकारण तापलं आहे. भाजप नेत्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. तर, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा चित्रपट चांगला असून अशा चित्रपटातून सत्य बाहेर येत आहे, असे म्हणत या चित्रपटाचं कौतूक केलं. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनीही या चित्रपटावर कमेंट करण्यास सुरुवात केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मोदींवर हल्लाबोल केला. आता, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरी येथील घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, लखीमपूर खेरी या घटनेवरही लखीमपूर फाईल्स नावाने चित्रपट बनवायला हवा, असेही त्यांनी म्हटलंय. अखिलेश यादव हे सितापूर जिल्हा दौऱ्यावर असताना ते म्हणाले की, शेजारील जिल्ह्यातच जीपने शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं होतं. वेळ यावा आणि लखीमपूर फाईल्सवरही चित्रपट निघावा, असे अखिलेश यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा नैतिक विजय झाला आहे. आमच्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली असून जागाही वाढल्या आहेत. त्या तुलनेत भाजपच्या जागा घटल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, सध्या देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने युवा वर्ग नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदी हेच चित्रपटाचे प्रचारकपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाची स्तुती केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे प्रचारक असून, भाजपवाले राजकीय अजेंडा रावबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार अजमल यांची मागणी"केंद्र सरकार व आसाम सरकारने द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. कारण या सिनेमामुळे जातीय तणाव निर्माण होईल. सध्याच्या भारतातील परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आसाममधील नेल्लीच्या घटनेसह काश्मीर बाहेर अनेक घटना घडल्या, परंतु त्यांच्यावर कधी चित्रपट आला नाही", असं खासदार बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले. विशेष म्हणजे, मी काश्मिर फाईल्स सिनेमा पाहिला नाही, असेही त्यांनी सांगितलं. खासदार बदरुद्दीन अजमल हे आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत.
चित्रपटाला गर्दी, टीका अन् कौतूकही विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. त्यातच भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटावर भाष्य केले. यानंतर यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.