लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी राजकीय समीकरणेही वेगाने फिरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधी पक्ष सरसावल्याचे दिसत आहे. यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. यानंतर समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली. यावेळी एकत्र मिळून भाजपला विधानसभा निवडणुकीत चीतपट करू, असा एल्गार यावेळी करण्यात आला.
यासंदर्भात समाजवादी पक्षाकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, वंचित, शोषित, मागासवर्ग, दलित, महिला, शेतकरी, तरुण अशा सर्व कमकुवत वर्गांसाठी समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष मिळून एकत्रितपणे लढेल. सपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफ, असा एल्गार करण्यात आला आहे.
अबकी बार भाजप साफ
समाजवादी पक्षासह ओमप्रकाश राजभर यांनीही ट्विट केले आहे. अबकी बार, भाजप साफ, समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आले एकत्र. दलित, मागास तसेच अल्पसंख्यकांसह सर्व वर्गांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारचे दिवस उरलेत फक्त चार, असा खोचक टोला ओमप्रकाश राजभर यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशमधील जनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. या दोन्ही पक्षाचे गठबंधन झाले, तर मऊ, बलिया, गाजीपूर, आझमगड, जौनपूर, आंबेडकर नगर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला.
दरम्यान, अखिलेश यादव यांनी यापूर्वी कोणत्याही बड्या राजकीय पक्षासह युती किंवा आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.