मैनपुरी : समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh yadav) यांनी मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून (Karhal Assembly Seat) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात अखिलेश यादव यांनी आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे.
प्रतिज्ञापत्रात अखिलेश यादव यांनी स्वत: आणि पत्नी व मुलांसह एकूण 40 कोटींची संपत्ती दाखवली आहे. अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात केवळ 40 कोटींची संपत्ती आहे. अखिलेश यादव हे जंगम, स्थावर अशा एकूण 40 कोटींच्या मालमत्तेचे मालक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अखिलेश यादव यांच्याकडे असलेली एकूण जंगम संपत्ती केवळ 8 कोटी 43 लाख 70 हजार 654 रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्याकडे 4 कोटी 76 लाख 84 हजार 986 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलगी आदिती यादव यांच्याकडे 10 लाख 39 हजार 410 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. अशाप्रकारे या तिघांची जंगम मालमत्ता जोडल्यास ही रक्कम 13 कोटी 30 लाख 95 हजार 41 रुपयांवर पोहोचते.
स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही अखिलेश यादव मागे नाहीत. अखिलेश यादव यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 17 कोटी 22 लाख 858 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्याकडे 9 कोटी 61 लाख 98 हजार 918 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशाप्रकारे या दोघांची एकूण स्थावर मालमत्ता 26 कोटी 83 लाख 99 हजार 776 रुपये आहे.
जंगम आणि स्थावर दोन्ही मालमत्ता जोडून अखिलेश यादव यांनी त्यांची एकूण 40 कोटी 14 लाख 94 हजार 817 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्या पक्षाच्या इतर उमेदवारांनी घोषित केली आहे. अनेक विधानसभांमधील त्यांच्या उमेदवारांनी कोट्यवधींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, आझमगडचे खासदार अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी अखिलेश यादव निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.