- सुधीर लंकेलाेकमत न्यूज नेटवर्कआजमगढ : कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्रांवर मोदींचे छायाचित्र आहे. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशात मोफत वितरित केल्या जाणाऱ्या रेशनच्या पाकिटावर मोदी-योगी यांचे फोटो आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे हे फोटो हटले, पण प्रशासनाने चलाखीने या पाकिटांवरही भगव्या रंगाची पट्टी टाकत घर घर मोदींचा संदेश पोहोचविला.
निवडणुकीच्या काही महिने आधीपासूनच सरकारने गावोगावी रेशन पोहोचले व त्यातून हा भगवा संदेशही घरोघर गेला. कोरोनामुळे सध्या येथे रेशनकार्डधारकांना एका कार्डवर कुटुंबामागे एक लीटर तेल, एक किलो मीठ व एक किलो डाळ मोफत दिली जात आहे. तसेच गहू व तांदूळ पाच किलो आहेत.
आजमगढ जिल्ह्यातील फुलपूर पवई मतदारसंघातील पालिया गावातील ज्येष्ठ नागरिक हब्बू म्हणाले, ‘गल्ला गरीब लोगो के लिए जरुरी है. लेकिन पाच किलो मे क्या होगा?’. येथे रेशनला गल्ला म्हणतात. हे रेशन देताना मधली मंडळी काटा मारतात असेही त्यांचे म्हणणे होते. विश्वास यादव म्हणाले, ‘सरकार नमक देयलस खराब निकलल’. हे मीठ खराब असल्याची तक्रार येथे भेटलेल्या इतर महिला व पुरुषांनीही केली.
बिलसिया गावातील पंकज चौहान म्हणाले, ‘सरकार कुठलेही असो त्यांनी गरिबांना काही वाटले की ते स्वतःचे फोटो चिकटवतात. अखिलेश सरकारने लॅपटॉप वाटले त्यावरही त्यांचा फोटो होताच’. उत्तर प्रदेशात घरोघर गेलेल्या मिठाच्या पुडीवरही सरकारचा ‘सोच इमानदार, काम दमदार’ हा संदेश होता. तो आचारसंहितेमुळे आता काढण्यात आला आहे.
आजमगढ मे सपा... अखेरच्या टप्प्यात ५४ जागांची निवडणूक आहे. यात आजमगढ जिल्ह्यातील सर्वाधिक दहा जागा आहेत. या जिल्ह्यात भाजपला गतवेळी केवळ एक, तर समाजवादी पक्षाला ५ व बसपला ४ जागा मिळाल्या होत्या. यावेळीही या बालेकिल्ल्यात समाजवादी पक्षच आघाडीवर राहील, असे फुलपूर मतदारसंघात फिरताना जाणवले. मोदींनी मी खाल्लेल्या मिठाला जागणार, असा उल्लेख शुक्रवारी मिर्जापूरच्या सभेत केला. पण मोदी व योगी सरकारने दिलेल्या मिठाबद्दल खाली गावांत नाराजी आहे. बिलसिया गावातील पंकज चौहान म्हणाले, ‘सरकार कुठलेही असो त्यांनी गरिबांना काही वाटले की ते स्वतःचे फोटो चिकटवतात.