लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भटक्या प्राण्यांच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रवासादरम्यान समोर आलेल्या बैलाचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले की, "प्रवासात बैल भेटतील… चालता येत असेल तर चाला… खूप अवघड आहे यूपीमध्ये प्रवास, चालता येत असेल तर चाला."
दरम्यान, अखिलेश यादव आज सीतापूर दौऱ्यावर होते. माजी मंत्री नरेंद्र वर्मा यांचे बंधू दिवंगत महेंद्र वर्मा यांना त्यांनी येथे श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव सतत भटक्या प्राण्यांचा मुद्दा उपस्थित करत होते.
आज समाजवादी पार्टीने बैलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी शेअर करताना ट्विट केले की, “शेतकरी शेतात चारा कापायला गेला, त्याचा मृत्यू झाला. पिलीभीतच्या काकरुआ गावात बैलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू, हे अत्यंत दुःखद! शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना, सरकारने आर्थिक मदतीची भरपाई द्यावी."
विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने 403 पैकी 255 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे समाजवादी पार्टीला 111 जागांवर यश मिळाले आहे. दरम्यान, पार्टीच्या पराभवावर अखिलेश यादव यांनी आज पुन्हा सांगितले की, "विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा नैतिक विजय झाला आहे. समाजवादी पार्टी वाढत आहे आणि समाजवादी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या संघर्षामुळे व सहकार्यामुळे भाजप कमी झाला आहे."
'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, अखिलेश यादवांचा मोदींवर निशाणाकाश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर तयार करण्यात आलेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरी येथील घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. लखीमपूर खेरी या घटनेवरही लखीमपूर फाईल्स नावाने चित्रपट बनवायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.