लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने यूपीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सपा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. सपाच्या कामगिरीनंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा उत्साह आणखी जास्त वाढला आहे. आता त्यांनी २०२७ संदर्भात असा मोठा दावा केला आहे, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं टेन्शन आणखी वाढू शकतं.
२०२७ मध्ये होणाऱ्या यूपी विधानसभा निवडणुकीत सपाचं सरकार स्थापन होईल, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. भाजपा सरकारने उत्तर प्रदेशातील जनतेचा विश्वास गमावला आहे, असा दावा त्यांनी केला. एवढच नाही तर लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीला विजयी करण्यासाठी मागास, दलित आणि अल्पसंख्याक समाजातील सर्व घटकांतील लोक एकत्र येऊन काम करत आहेत.
अखिलेश यादव म्हणाले की, समाजात फूट पाडण्याचं भाजपाचे राजकारण जनतेने पूर्णपणे नाकारलं आहे. सपा अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारवरही जोरदार निशाणा साधला. "ऊपर से जुड़ा कोई तार नहीं, नीचे कोई आधार नहीं. अधर में जो है अटकी हुई वो तो कई सरकार नहीं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे."भाजप सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यांचा खोटारडेपणा आणि लूट जनतेसमोर उघड झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा संविधान आणि लोकशाहीचा विजय आहे" असंही अखिलेश यांनी म्हटलं.
यूपीमध्ये सपाने 37 जागा जिंकल्या
यूपीमध्ये लोकसभा निवडणुकीत सपाने चांगली कामगिरी केली. राज्यात पक्षाने 37 जागा जिंकल्या. तर भाजपाने 33 जागा जिंकल्या. यूपीमध्ये सपाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या इंडिया आघाडीने 43 जागा जिंकल्या आहेत. एनडीएला 36 जागा मिळाल्या. तर आझाद समाज पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे.