Bihar Politics Updates: बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून इंडिया आघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. बिहार दुसरे सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार एनडीएसोबत सरकार स्थापन करणार असून, २८ जानेवारी रोजी ९ व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असा दावा केला जात आहे. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली.
नितीश कुमार इंडिया आघाडीत राहिले असते तर ते पंतप्रधान होऊ शकले असते. येथे पंतप्रधानपदासाठी कोणाचाही विचार केला जाऊ शकतो. नितीश यांना इंडिया आघाडीचा समन्वयक किंवा अन्य कोणतेही मोठे पदही देता आले असते. काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यायला हवा. इंडिया आघाडीबाबत आणि नितीश कुमार यांच्याबाबत जी तत्परता दाखवायला हवी होती, ती काँग्रेसने दाखवली गेली नाही. त्याच्याशी बोलायला हवे होते. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे. कारण नितीश कुमार यांनीच पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची स्थापना केली, असे अखिलेश यादव म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राहुल गांधींसोबत प्रचार करणार का, असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारण्यात आला होता. यावर, आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यांच्यासोबत प्रचार करणार की नाही हे येणारा काळच सांगेल. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, त्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच भाजपा राम मंदिरावर राजकारण करत आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने आपल्या सर्व आमदारांना पाटणामध्ये बोलावले आहेत. तसेच जेडीयूकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २८ जानेवारी रोजी पाटणामध्ये महाराणा प्रताप रॅली होती, ही रॅलीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. तर भाजपाचे बिहारमधील सर्व प्रमुख नेते हे हायकमांडसोबत बैठकांवर बैठका घेत आहेत. एनडीएतील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबतही चर्चा केली जात आहे.