अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याची जोरात तयारी सुरू आहे. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण विविध मान्यवरांना पाठवण्यात येत आहे. तसेच या निमंत्रणावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे आपल्याला या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचे सांगत होते. मात्र आता विश्व हिंदू परिषदेकडून समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
मात्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण घेऊन निमंत्रक आले असताना अखिलेश यादव यांनी हे निमंत्रण स्वीकारलं नाही. विश्व हिंदू परिषदेकडून आलोक कुमार हे अखिलेश यादव यांच्याकडे निमंत्रण घेऊन गेले होते. मात्र अखिलेश यादव यांनी मी त्यांना ओळखत नाही, असे सांगितले. तसेच ज्यांना आम्ही ओळखत नाही त्यांना निमंत्रण देत नाही आणि त्यांच्याकडून निमंत्रण स्वीकारतही नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितलं की, सुरुवातीला ते जर बोलावलं तर आम्ही जावू म्हणून सांगत होते. आता आम्ही निमंत्रण दिलं तर श्रीरामांनी बोलावलं तर जाऊ म्हणताहेत. आता श्रीराम त्यांना स्वत: बोलावतात का हे पाहावे लागेल. जर त्यांना बोलावलं नाही तर त्यांना बोलावण्याची श्रीरामांची इच्छा नव्हती, असं म्हणावं लागेल.