लखनऊ: नागरिकत्व संशोधन कायद्याला देशभरातून विरोध होत असून उत्तर प्रदेशात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. तर याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी ठरवत सरकारच्या आदेशानुसारच जाणीवपूर्वक जाळपोळ व हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे.
पुढे बोलताना अखिलेश म्हणाले की, ज्या प्रदेशाचे मुख्यमंत्री बदल्याची भाषा वापरत असेल. तेथील पोलिसांकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाला पोलीस जवाबदार असून, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक तोडफोड व वाहनांवर गोळीबार करण्यात आला असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे.
अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्यांच्या मुद्दय़ावर भाजपा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली पसरवल्या जात आहेत. दंगलीचा फायदा भाजपला होतो. दंगल घडवून आणणारे लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तसेच भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.
देशातील हिंसाचाराच्या घटनेमुळे जगभरात देशाची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 'ठोक देंगे आणि बदला ले लो' असे शब्द वापरले जात असल्याने परिस्थिती चिघळत असल्याचे आरोपही खिलेश यादव यांनी केला आहे.