नवी दिल्ली - समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गंगा नदी अस्वच्छ असल्याचा दावा करत चांगलाच निशाणा साधला आहे. "गंगा नदी स्वच्छ नाही हे योगींना माहीत आहे म्हणून त्यांनी नदीत स्नान केलं नाही" अशी बोचरी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी वाराणसीच्या ललिता घाट येथे गंगा नदीची पूजा करत स्नान केलं. ते काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी आले होते.
"काशीतील गंगा आरतीने नेहमीच नवीन उर्जा मिळते. काशीतील मोठे स्वप्न पूर्ण करून दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीसाठी उपस्थित होतो आणि माता गंगेला तिच्या कृपेसाठी नमन केले" असं मोदींनी म्हटलं आहे. याच दरम्यान अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "प्रश्न हा आहे की गंगामाता स्वच्छ होणार का? त्यासाठी मिळालेला पैसा वाहून गेला, मात्र गंगा अजूनही स्वच्छ झालेली नाही" असं देखील म्हटलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत लोक त्यांचे शेवटचे दिवस वाराणसीमध्ये घालवतात असं म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर
नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी काशी कॉरिडॉरचे उद्घाटन केले. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेतला. यानंतर त्यांनी क्रूझ राईड केली. नंतर ते अस्सी घाट आणि संत रविदास घाटावर पोहोचले. येथे त्यांनी संत रविदासांना नमन केले. एवढेच नाही, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पीएम मोदी रात्री उशिरा वाराणसी स्टेशनवर पोहोचले. पीएम मोदींनी वाराणसी स्टेशनचे काही फोटोही शेअर केले आहेत.
पीएम मोदींनी ट्विट करत लिहिले आहे, "पुढचा थांबा...वाराणसी स्टेशन. आम्ही रेल्वेचे जाळे वाढवण्यासोबतच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवाशांना अनुकूल असेल, अशी रेल्वे स्थानके बनविण्यासाठी काम करत आहोत." पंतप्रधान मोदींनी काशीमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. काशीतील मोठ्या विकासकामांची पाहणी करत असल्याचे ट्विट त्यांनी केले. या पवित्र शहरासाठी सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.