लखनऊ - केंद्र सरकारने देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले असून या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजपाचे नेते स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, मग कळेल तिथे काय होतं ते' असं म्हणत स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानमध्ये जायला हवं. तिथे एक महिना मंदिरात जाऊन पूजा करायला हवी. तेव्हा त्यांना तिथे नेमकं काय होतं हे समजेल. काय हवंय हे त्यांनाच माहीत नाही' असं स्वतंत्र देव सिंह यांनी गुरुवारी (2 जानेवारी) म्हटलं आहे.
अखिलेश यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यांचा अभ्यास करायला हवा असं देखील भाजपा नेत्याने म्हटलं आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी प्रियंका गांधींवरही आरोप केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत काँग्रेसच्या प्रियंका गांधी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.
एनपीआरचा फॉर्म भरणार नाही. आपण भारतीय नागरिक आहोत की नाही, हे भाजपा ठरवू शकत नाही. आम्हाला रोजगार पाहिजे, एनपीआर नको. देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, असे सांगत अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर हल्लाबोल केला होता. याशिवाय, आम्ही एनआरसी आणि एनपीआर फॉर्म भरणार नाही, तर महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या आंदोलनात कागदपत्रे जाळली होती. आपणही तसेच करायचे, असे आवाहन अखिलेश यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले होते. याचबरोबर, भाजपा सरकार जनतेला घाबरत आहे. त्यामुळे भाजपा सत्य काय आहे, ते जनतेपर्यंत पोहचू देत नाही. देशात अन्याय खूप वाढला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दिला जात नाही. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान अनेक निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना समाजवादी पार्टीकडून मदत करण्यात येईल, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले होते.