Akhilesh Yadav vs BJP, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहेत, मात्र आजपासून विविध आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सत्ताधारी असो की विरोधक, दोघेही विजयाचा दावा करत आहेत. या दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार निशाणा साधला. "भाजपाने मतदारांची फसवणूक करून निवडून आलेली सरकारे पाडली. तसेच राजकीय स्वार्थासाठी कुटुंबांमध्ये भांडणं लावली," अशा शब्दांत अखिलेश यादवांनी भाजपावर टीका केली.
"भाजपाने जनतेच्या आरोग्याशी खेळ केला. योग्य चाचणी न करता लस देण्यात आली. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली. भाजपाने निवडून आलेली सरकारे पाडली आणि राजकीय स्वार्थासाठी कुटुंबांमध्ये भांडणं लावली. यांच्या काळात महागाई वाढली, श्रीमंतांची कर्जे माफ झाली आणि मणिपूरसारख्या घटना घडल्या, पेपर फुटले, बेरोजगारी वाढली, महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले," असे अखिलेश यादव म्हणाले.
"भाजपाच्या काळातच मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. इलेक्टोरल बाँडमुळे महागाई वाढली. नोटाबंदीमुळे गरिबी वाढली. खतांच्या पोत्यांची अफरातफर केली. श्रीमंतांची कर्जे माफ झाली. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. गुन्हेगारांना पक्षात सामील करून घेतले. ज्यांनी शेतकऱ्यांची हत्या केली त्यांना मंत्रीपदी ठेवले. न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप केला. ईडी-सीबीआयचा वापर सरकार पाडण्यासाठी झाला आणि विकासाच्या नावाखाली खोटे आकडे दिले गेले," असा आरोपही यादव यांनी केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निकालाची प्रतीक्षा आहे. उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.