पंतप्रधान मोदींच्या 'सूर्यनमस्कार'च्या वक्तव्यावर अखिलेश यादवांचा खोचक टोला; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:14 AM2020-02-10T11:14:47+5:302020-02-10T11:20:08+5:30
देशात बेरोजगारी वाढत आहे. मात्र पंतप्रधानांकडे त्यावर विचार करण्यासाठी फुरसत नाही. त्यामुळे त्यांनी बेरोजगारांसाठी एखादे आसन सांगावे, असा खोचक टोला अखिलेश यांनी लगावला.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात, आपण यापुढे अधिक सूर्य नमस्कार करणार असल्याचे म्हटले होते. जेणेकरून जनतेने मारलेल्या काठ्यांमुळे मला काहीही होणार नाही. मोदींच्या या वक्तव्याला धरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी सूर्य नमस्कार वाढवून आपला खांदा मजबूत करण्याची गोष्ट करत आहेत. मात्र त्याचवेळी त्यांनी देशातील बेरोजगार युवकांच्या वडिलांसाठीही एखादे आसान सांगायला हवं होतं. देशात बेरोजगारी वाढत आहे. मात्र पंतप्रधानांकडे त्यावर विचार करण्यासाठी फुरसत नाही. त्यामुळे त्यांनी बेरोजगारांसाठी एखादे आसन सांगावे, असा खोचक टोला अखिलेश यांनी लगावला.
गेल्या आठवड्यात काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली होती. बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील. राहुल गांधींच्या या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी लोकसभेत यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर मोदींनी त्याला प्रत्युत्तर दिले होते.
मोदी म्हणाले होते, एका काँग्रेस नेत्याने सांगितले की देशातील तरुण मोदीला दांड्याने मारतील. मी पुढील सहा महिने अशी सूर्यनमस्काराची संख्या वाढवेन की पाठ मजबूत झाली पाहिजे. यामुळे कोणीही दांडा मारू शकेल. मी आतापर्यंत अनेकदा घाणेरड्या शिव्या ऐकल्याचे मोदी म्हणाले होते. त्यावर अखिलेश यादव यांनी टोला लगावला.