लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव शुक्रवारी विधान भवनाच्या व्हीआयपी लिफ्टमध्ये तब्बल अर्धा तास अडकून पडले. यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ माजला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी विधान भवनाच्या राजर्षी टंडन सभाकक्षात आयोजित ‘बाल संसदे’त सहभागी होण्यासाठी आले. व्हीव्हीआयपी लिफ्ट क्रमांक १ मधून परत जात असताना तांत्रिक बिघाडामुळे त्यांची लिफ्ट अचानक अर्ध्यात अडकून पडली. या घटनेनंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. लिफ्टचा दरवाजा कापण्यासाठी गॅस कटर मागवण्यात आले. सोबतच रुग्णवाहिकाही बोलावली गेली. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर अखेर लिफ्ट दुरुस्त झाली आणि अखिलेश पत्नीसह लिफ्टमधून बाहेर आले. सदर लिफ्ट केवळ मुख्यमंत्री आणि अतिविशिष्ट लोकांसाठी आरक्षित आहे. अशास्थितीत या लिफ्टमध्ये खुद्द मुख्यमंत्री अडकून पडणे सुरक्षाविषयक मोठी त्रुटी मानण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
लिफ्टमध्ये अडकले अखिलेश यादव
By admin | Published: December 19, 2015 1:39 AM