नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
"भाजपचे लोक काहीही करू शकतात. ते कोणालाही अपमानित करू शकतात. त्याला काही कारण हवेच असे नाही. भाजपाला कशाचीतरी भीती वाटत आहे. ते घाबरले आहेत आणि त्यातून त्यांनी तपास यंत्रणांना कामाला लावलं आहे. अडचणीचे ठरतील अशा व्यक्तींना टार्गेट करायचे हे त्यांचे जुनेच कारनामे आहेत. अशा व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याला जेलमध्ये टाकले जाते. त्याची मानहानी केली जाते. सूडबुद्धीने हे उद्योग चालतात. असा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला आहे. मलिक यांच्याबाबतीतही तेच झाले" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
भाजपाने विधानसभेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली गेली. संशयास्पद वस्तूही सापडली मात्र नंतर तपासातून तो लाकडाचा भुसा असल्याचे स्पष्ट झाले असंही अखिलेश यांनी म्हटलं आहे. अटक केलेले मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री, नेते यांची बैठक झाली.
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार
ईडी, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भाजपचे षडयंत्र याविरुद्ध महाविकास आघाडीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार गुरुवारी सकाळी १० वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देतील. शुक्रवारपासून राज्यभर धरणे, मोर्चे असे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या अन्य ज्येष्ठ नेते, मंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी दीड तास बैठक झाली. या अटकेनंतर महाविकास आघाडीने कोणता पवित्रा घ्यावा यावर विचार झाला. कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांसमोर झुकायचे नाही आणि या कारवायांच्या मागे भाजप व केंद्र सरकार असल्याचे जनतेत जाऊन सांगायचे, असा निर्णय बैठकीत झाला.