ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 26 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून झालेला दारुण पराभव भलताच मनाला लावून घेतला असून याचा सर्व राग भगव्यावर निघताना दिसत आहे. याचं उदाहरण पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं, जेव्हा एका पत्रकारावर अखिलेश यादव फक्त यासाठी वैतागले कारण त्याने भगव्या रंगाचे कपडे घातले होते. भगव्या रंगाचे कपडे घालणारे देशातील वातावरण बिघडवत असल्याचं अखिलेश यादव बोलले आहेत.
लखनऊत समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवपाल यादव यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन अखिलेश एका पत्रकारावर भडकले. त्यांनी आपला राग व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही नवे आलेले दिसता आणि तुमच्या कपड्याचा रंगही भगवा आहे. राजकारणामुळे जेव्हा देशाचं वाटोळं होईल तेव्हा तुम्ही कुठेच सापडणार नाही. तुमच्यासारख्या लोकांमुळे देशाचं वाटोळं होणार आहे".
यावेळी अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. "भगवा घातलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलिसांवर हल्ला करण्याचा परवाना मिळाला आहे. आग्रा, सहारनपूर आणि अलाहाबादमध्ये अशा घटना समोर आल्या आहेत. हे फार वाईट आहे", असं अखिलेश यादव बोलले आहेत.
पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांना शिवपाल यादव यांच्याकडून पक्षाचं नेतृत्व मुलायम सिंह यादव यांच्याकडे सोपवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावरुन अखिलेश यादव भडकले आणि म्हणाले की, "सर्व पत्रकारांनी मे महिन्यातील एक दिवस निवडावा. त्यादिवशी मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. त्यानंतर माझ्या कुटुंबाशी संबंधित कोणताच प्रश्न विचारु नका".