नवी दिल्ली - देशभरात नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध आंदोलन होत आहे. मागील काही दिवसांत लखनौमध्ये या कायदाला होत असलेला विरोध चर्चेत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नागरिकता कायद्याच्या समर्थनात लखनौमध्ये सभा घेतली आहे. त्यातच सोशल मीडियावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची कन्या टीना यादव हिने सहभाग घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर टीना यादवचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोसोबत लिहिले की टीना देखील नागरिकता कायद्याविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार टीना आपल्या मित्रांसोबत लखनौ येथील घंटाघरात पोहोचली होती. घंटाघर येथे अनेक दिवसांपासून महिला नागरिकता कायद्याविरुद्ध आंदोलन करत आहेत.
यावर समाजवादी पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. अखिलेश यादव यांची मुलगी आंदोलनात सामील झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच टीना घंटाघर परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यासोबत कोणीतरी सेल्फी काढला, असं स्पष्टीकरण समाजवादी पक्षाकडून देण्यात आले. अखिलेश यादव सीएए, एनसीआर आणि एनपीआरचा विरोध करत आहेत. देशातील लोकांच्या समस्या सोडविणे होत नसताना असा कायदा आणण्याचा काय उपयोग असा सवालही अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.