लखनौ : उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह यादव व त्यांचे पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असून, त्यामुळे कदाचित समाजवादी पक्षातच फूट पडण्याची आणि प्रसंगी अखिलेश यादव विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसशी समझोता करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुलायम यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या अखिलेश यांनी गुरुवारी रात्री ३२५ उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली. त्यांच्या यादीत १७१ विद्यमान आमदारांची नावे आहेत. तसेच ६४ नव्या उमेदवारांचीही नावे आहेत. मुलायमसिंग व अखिलेश यांच्या यादीत ७९ नावे वेगळी आहेत. म्हणजेच मुलायमसिंग यांनी उमेदवारी नाकारलेल्यांना अखिलेश यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.मुलायमसिंग यांनी बुधवारी यादी जाहीर करताना समाजवादी पक्षाचा काँग्रेस वा कोणत्याचे पक्षाशी समझोता होणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र अखिलेश यादव काँग्रेसशी समझोता व्हावा, या मताचे असल्याचे सांगण्यात येते. वडील व मुलगा यांच्या वागदाचे हेही एक कारण आहे. नवा मुख्यमंत्री निवडणून आलेले आमदारच ठरवतील, असे सांगून मुलायमसिंग यांनी अखिलेश हे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे सांगण्यास नकार दिला. हेही अखिलेश यादव यांना खटकले आहे. आपले वडील तसेच शिवपाल यादव हे काका आपणास डावलत आहेत, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते प्रसंगी वेगळी चूल मांळु शकतील, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यातील ४०३ जागांपैकी ३२५ उमेदवारांची यादी मुलायम व त्यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी काल जाहीर केली. त्यात आपल्या समर्थकांना स्थान न मिळाल्याने अखिलेश यांनी आपले समर्थक आमदार व नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी यादीवर तीव्र नाराजी जाहीर केली. बैठकीनंतर आमदार इंदरसिंह यांनी, अखिलेश उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करतील. मुलायम आमचे आदर्श आहेत; परंतु आज राज्याला अखिलेश यांची गरज आहे. त्यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला आहे, असे जाहीर केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अखिलेश यादव यांची स्वतंत्र चूल?
By admin | Published: December 30, 2016 1:26 AM