कमल के. दुबे , लखनौदोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पाहता सपाप्रमुख मुलायमसिंग यादव पुन्हा एकदा सर्जनची भूमिका बजावणार आहेत. अखिलेश मंत्रिमंडळाचा चेहरा सुधारण्यासाठी त्यांना शस्त्रक्रियेचाच पर्याय शोधावा लागणार असे दिसते. मंत्र्याच्या कामकाजावर नाराज असलेल्या मुलायमसिंग यांनी अनेकदा कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. समाजवादी पक्षाचा पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग प्रशस्त करायचा झाल्यास यावेळी त्यांना संपूर्ण मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलावा लागेल.मुलायमसिंग यादव यांनी अलीकडेच मुख्यमंत्री अखिलेश यादव, प्रो. राम गोपाल यादव, ज्येष्ठ मंत्री आझम खान आणि शिवपालसिंग यादव यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावत अशा शस्त्रक्रियेसाठी पार्श्वभूमी तयार केली आहे. पंचायत निवडणुका पार पडताच फेरबदलाचा अंक पार पाडला जाऊ शकतो. मंत्रिमंडळातील पाच ते सात बुजूर्गांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. दीर्घ अनुभव पाहता या नेत्यांना स्थान देण्यात आले होते. अनेकदा समज देऊनही कामकाज न सुधारणाऱ्या बलरामसिंग यादव, अंबिका चौधरी यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली होती. उर्वरित मंत्र्यांनाही हा इशारा होता.मंत्र्यांचे ठोके वाढले...टांगती तलवार असलेल्या मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. मुलायमसिंग यांनी सातत्याने समज दिलेल्या काही मंत्र्यांनी दबक्या आवाजात तक्रारी चालविल्या आहेत. दुसरीकडे दीर्घकाळापासून लाल दिव्याच्या गाडीची आस लावून बसलेल्या आमदारांचे धैर्य ढळू लागले आहे. रविदास मेहरात्रा यांनी रस्त्यावर उतरत पक्षाच्या अनेक आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्यासह आस लावून बसलेल्या अन्य काही आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा आहे.
मुलायमसिंग करणार अखिलेश मंत्रिमंडळाची ‘सर्जरी’
By admin | Published: September 28, 2015 2:02 AM