नवी दिल्ली : सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार समोर येत असताना आता एका नवीन आणि धोकादायक व्हायरसबाबत सरकारने वॉर्निंग दिली आहे.
सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणारी सरकारची तंत्रज्ञान शाखा, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने विंडोज आणि लिनक्स-आधारित प्रणालींना लक्ष्य करणाऱ्या नवीन इंटरनेट रॅन्समवेअर व्हायरस ‘अकिरा’बाबत चेतावणी जारी केली आहे. याद्वारे वैयक्तिक माहिती चोरून त्याबदल्यात पैसे उकळले जातात.
‘अकिरा’मागील हल्लेखोरांचा गट प्रथम त्यांच्या पीडितांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती चोरतो आणि नंतर पैसे उकळण्यासाठी सिस्टमवरील डेटा एन्क्रिप्ट करतो. चोरलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून वापरकर्त्याकडून खंडणी मागितली जाते.
पीडित व्यक्तीने खंडणी देण्यास नकार दिल्यास त्याच्याबाबत चोरलेली माहिती डार्क वेब ब्लॉगवर जारी केली जाते. परिणामी, वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यांचा वापर जपून करा
हा व्हायरस व्हीपीएनद्वारे सिस्टममध्ये प्रवेश करतो. हा गट एनी डेस्क, विनरार आणि पीसी हंटरसारखे टूल्स वापरत असल्याचे आढळून आले आहे, जे अनेकदा पीडितांच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत हे टूल्स जपून वापरावेत.
काय कराल?
इंटरनेट वापरकर्त्यांनी अशा हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षण प्रोटोकॉल, अँटी व्हायरस वापरावे.
डेटा गमावू नये यासाठी महत्त्वाच्या डेटाचा ऑफलाइन बॅकअप ठेवावा. ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्स नियमित अपडेट करावे. सोपा पासवर्ड नसावा. मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन असावे. अनधिकृत चॅनलवरून अपडेट्स, डाउनलोड करणे टाळावे.
सायबर आणि रॅन्समवेअर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.