शीलेश शर्मा, नवी दिल्लीगुजरात सरकारद्वारे वितरित करण्यात आलेल्या भारताच्या नकाशात अक्साई चीन हा चीनचा प्रदेश दाखविण्यात आला असून अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरला वादग्रस्त भाग म्हटले आहे़ काँगे्रसने यावर तीव्र आक्षेप नोंदवला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी पुढे रेटली आहे़काँग्रेस प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी आज सोमवारी हा मुद्दा उचलून धरला़ गत १७ सप्टेंबरला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली गेली़ याचवेळी गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव डी़जे़ पंडियान यांनी हा नकाशा वितरित केला होता़ सिंघवी यांनी यानिमित्ताने मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली़ चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात होते़ मोदी सरकारने चिनी राष्ट्राध्यक्षांसोबत ‘गोडगोड’ चर्चा चालवली होती आणि तिकडे चिनी सैनिक चुमार आणि लडाखमध्ये तंबू उभारत होते़ त्यांची घुसखोरी सुरू होती़ पण भारताच्या अखंडतेबाबत कुठलीही तडजोड केली जाऊ शकत नाही़ हा कुण्या पक्षाचा वा विचारधारेचा प्रश्न नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले़चिनी सैनिकांच्या भारतातील घुसखोरींचा तारखानिशी तपशील सिंघवी यांनी यावेळी दिला़ अरुणाचलमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मोठमोठ्या बाता मारणाऱ्या मोदींनी अक्साई चीन हा चीनचा भाग कसा ते सांगावे? भारताचे अभिन्न अंग असलेला अरुणाचलप्रदेश वादग्रस्त क्षेत्र कसे? चीनने अरुणाचलप्रदेशवर दावा केला असला तरी जो दावा खरा नाही, असा दावा भारत कसा स्वीकारू शकतो? असे सवाल त्यांनी केले़
गुजरातच्या नकाशात अक्साई चीन चीनचा
By admin | Published: September 23, 2014 6:14 AM