लखनौ, दि. 4 - देशात स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'स्वच्छ भारत अभियान'वर अधिक भर देत आहेत. 'स्वच्छ भारत' अभियान यशस्वी होण्यासाठीही प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी करताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातही स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी स्वच्छता मोहीमेचा शंखनाद केला.
यावेळी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व अभिनेत्री भूमि पेडणेकर यांनीही मोहीमेत सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानापासून प्रभावित होऊन अक्षय कुमारनं आतापर्यंत अनेकदा या व अशा प्रकारच्या अनेक मोहीमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
उत्तर प्रदेशातील या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय कुमारनं हजेरी लावली. लखनौमधील रायबरेल रोडवर शुक्रवारी मिलेनियम शाळेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अक्षय कुमारनं स्वच्छता अभियान मोहीम सुरू केले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अक्षय कुमार, भूमि पेडणेकर आणि शाळा प्रशासनासोबत जोडले गेलेल्या लोकांनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांचीही लक्षनीय उपस्थिती होती.
यावेळी खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हातात झाडू घेऊन राज्यातील जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम केले. सोबतच योगींनी कार्यक्रमात स्वच्छतेचा शंखनादही केला
उत्तर प्रदेशातील सर्व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, हा आयोजित कार्यक्रमाचा उद्देश होता. दरम्यान, अक्षय कुमारचा ''टॉयलेट : एक प्रेम कथा'' या आगामी सिनेमाद्वारे स्वच्छता राखण्यासंदर्भातील संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सर्वांनी आपल्या आसपासच्या परिसरात, घर तसेच राज्यही स्वच्छ ठेवावे, अशी इच्छा यावेळी अक्षयनं व्यक्त केली. अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ च्या प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशात आपल्या टीमसोबत आला होता. यावेळी अक्षय कुमार आणि सिनेमातील मुख्य अभिनत्री भूमि पेडणेकरनंही मुख्यमंत्री योगींसोबत हातात झाडू घेत परिसर स्वच्छ केला.