नवी दिल्ली - बॉलिवूडचा इंटरनॅशनल खिलाडी आणि सुपरस्टार अक्षयकुमारचा दानशूरपणा सर्वांनाच माहिती आहे. अक्षय नेहमीच देशावर आलेल्या संकटासाठी धावून येतो. मग, सीमारेषेवरील जवानांच्या कुटुंबीयांना मतद करणे असो, किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पीडित कुटुबीयांसाठी मदतीचा हात देणं असो, अक्षयकुमार एक पाऊल पुढे असतो. त्यातूनच, एक देशभक्त आणि संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षयकुमार पुढे आला आहे.
अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल करण्यात आले. पंतप्रधानांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवरुन अक्षयला नेटीझन्सने लक्ष्य केले. तसेच, अक्षयच्या कॅनडातील नागरिकत्वाचा मुद्दाही चर्चेला आला. तर, मतदानादिवशी अक्षय कुठे गेला होता? असे प्रश्नही उपस्थित झाले. त्यास, अक्षयकुमारने आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन स्पष्टीकरणही दिले. मात्र, अक्षयने पुन्हा एकदा आपल्या कार्यातून आपली देशाप्रती आणि देशवासियांप्रती असलेली आपलेपणाची भावना दाखवून दिली आहे. ओडिशात आलेल्या फनी वादळाच्या तडाख्यानंतर ओडिशाला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यात, अक्षयनेही आपला खारीचा वाटा उचलला आहे. अक्षयने ओडिशातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सहायता कक्षाकडे 1 कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे, याबाबत हिंदूस्थान टाईम्स या ऑनलाईन वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. अक्षयने यापूर्वीही भारत के वीर या मोहिमेसाठी जवानांच्या कुटुंबीयांसाठी 5 कोटींची मदत मिळवून दिली होती. तर, केरळ आणि चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीलाही अक्षय धावून गेला होता.
दरम्यान, ओडिशामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या तुफान चक्रीवादळाचा तडाखा राज्याला बसला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी फनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्वरला पोहचल्यानंतर त्याठिकाणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांचे स्वागत केले. फोनी वादळामुळे तडाखा बसलेल्या जागांची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून केली. फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वादळाचा सामाना करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चांगले काम केले आहे. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली आहे. केंद्र सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारसोबत आहे.