नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे मोदींची ही मुलाखत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने घेतली आहे. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले आहेत. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले आहे.
अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. 'मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?' असा प्रश्न अक्षयने पंतप्रधान मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागचं एक विशेष कारण असल्याचे सांगितलं आहे. 'मी अनेकदा मीटिंगमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिलं तर माझ्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घालतो कारण वेळ पाहायचा झाल्यास समोरच्या लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येतो,’ असं स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
ममतादीदी दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात- मोदी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात, याचीही आठवण मोदींनी करून दिली आहे. मी फार लहान वयात घर सोडलं. कारण तेव्हाचं जीवन वेगळंच होतं. केव्हा केव्हा कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा व्हायची, तेव्हा आईला बोलावून घ्यायचो, परंतु नंतर आईच बोलायची की मी इथे काय करणार, मी परत जाते. मोदी म्हणाले, माझ्याकडे जेव्हा आई येते, तेव्हा तिला वेळ देता येत नाही. एखाद दुसऱ्या वेळी फक्त तिच्याबरोबर जेवण होते. जर एखादी घटना मला न आवडल्यास मी ती कागदावर लिहितो. ती घटना का झाली, त्यानंतर तो कागद फेकून देत होतो. परंतु तरीही मनाला काही शांती मिळत नव्हती. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी ती घटना कागदावर उतरवत राहतो आणि कागद फाडून टाकतो. तेव्हा मीसुद्धा चुकीचा असल्याचं कळत होतं.
नाराजी, राग आणि लोभ हे मनुष्याच्या स्वभावाचे गुण आहेत, असंही मोदी म्हणाले आहेत. मी बऱ्याच काळापासून मुख्यमंत्री होतो. मी लहानपणी रामकृष्ण मिशन आश्रमातही गेलो होतो. 20 वर्षांच्या वयातच मी फार फिरलो. खूप भटकलो आणि जग बघितलं. फिरत फिरतच मी इथपर्यंत आलो. मी काय होईन हे मलाच ठाऊक नव्हतं, पण मी पंतप्रधान झालो.
'नरेंद्रभाई, जरा जास्त झोप घेत जा, 'बराक'नेही मला तेच सांगितले' अक्षयने मोदींच्या खासगी जीवनाविषयकही अनेक प्रश्नांची विचारणा केली. त्यावेळी, तुम्ही केवळ 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच ? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांचा संदर्भ देत, तेही मला हेच सांगतात, असे मोदींनी म्हटले. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण, ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही दोघेही एकेमकांना आरे-तुरे करतो. मागे एकदा ओबामा मला भेटले तेव्हाही ते म्हणाले, माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. पूर्ण झोप घेत जा... असे ओबामी म्हणाले. त्यावेळीही मी हसलो. आता, माझ्या शरीराला 3 ते 4 तास झोपेची सवय झाली आहे. मात्र, कमी झोप झाल्यामुळे कुठलाही त्रास किंवा ताण माझ्या शरीरावर पडत नाही, असे मोदींनी म्हटले.
अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मीही त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं. तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. काहीतरी नवीन करतोय, असे म्हणत अक्षय कुमारे राजकीय प्रवेशाकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, त्यानंतर अक्षयनेच मी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले. तर, आज सकाळी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेऊन सर्वांनाचा आश्चर्याच धक्का दिला आहे.