ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारने सुकुमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले आहेत. राजनाथ सिंह यांनी अक्षय कुमारचं कौतुक करत मदत केल्याप्रकरणी आभार प्रकट केले आहेत. सुकुमा येथे 11 मार्च रोजी माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारने 9 लाखांची मदत दिली आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेनंतर लगेचच अक्षय कुमारने गृहमंत्रालयाशी संपर्क साधला होता. आर्थिक मदत करता यावी यासाठी अक्षयने शहिदांच्या कुटुंबीयांचं बँक खातं क्रमांक पुरवण्याची विनंती केली. मंत्रालयाने त्यांची विनंती स्वीकार करत सीआरपीएफमधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची बँक खाती क्रमांक पुरवण्याचे आदेश दिले होते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जेव्हा यासंबंधी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ट्विट करत अक्षय कुमारचं कौतुक केलं. 'तुम्ही दाखवलेला उदारपणा नक्कीच स्तुत्य आहे. तुमचं हे पाऊल इतरांनाही पुढे येऊन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची प्रेरणा देईल', असं राजनाथ सिंह म्हणालेत.
I thank Shri @akshaykumar on donating a generous amount for the welfare of the families of CRPF martyrs who lost their lives in Sukma https://t.co/sVrp6RGiFd— Rajnath Singh (@rajnathsingh) March 16, 2017
राजनाथ सिंह एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. 'सुकुमातील शहीद जवानांसाठी आर्थिक मदत करणा-या अक्षय कुमारचे मी आभार मानतो', असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
The generosity of Shri @akshaykumar is highly commendable. This gesture will inspire others to come forward & help the families of martyrs— Rajnath Singh (@rajnathsingh) March 16, 2017
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणुसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत करण्याचे अक्षय कुमारने जाहीर केले. गुरुवारी अक्षयने त्यांच्या कुटुंबीयाच्या खात्यावर नऊ लाख रुपये पाठवले. सीआरपीएफनेही निवेदन जारी करत अक्षय कुमारने देश आणि विशेष करुन सीआरपीएफसाठी आपली देशभक्ती दाखवून दिली असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने याआधी भारतीय लष्कराच्या जवानांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती.