नवी दिल्ली - देशावरील कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे, त्यातच दहशतवादी कारवायांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, देशातील एटीएस आणि पोलीस दलाने कार्यतत्परतेनं दहशतवादी कारवायांचा कट उधळून लावला. एटीएसनेउत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काकोरी (Kakori) येथे 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अल कायदा या दहशवादी संघटनेचे हे हस्तक असून सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा त्यांचा डाव असल्याचे उघडकीस आलं आहे. यासंदर्भात यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.
दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. लखनौमधील दहशतवाद्यांच्या अटकेच्या बातमीनंतर देशभरात सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरपासून (Jammu-Kashmir) देशाच्या उर्वरित भागात सर्चऑपरेशन केले जात आहे. या दरम्यान दहशतवाद्यांचे कनेक्शन बांग्लादेशशी दिसून येत आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपर्यंत भारतीय सुरक्षा संस्था वेगाने या तपासात प्रगती करत आहेत.
लखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे चाकेरी, जाजमऊ, चमनगंज आणि बेगमगंजसह अनेक भागात छापा टाकला. या दरम्यान, कानपूरमध्ये असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याविषयी माहिती मिळाली, त्यानंतर अतिरेक्यांच्या नेटवर्कची मोठ्या प्रमाणावर चौकशी केली गेली. सुत्रांच्या माहितीनुसार, चमनगंजमधील पेचबाग येथून पोलीस आणि एटीएसच्या टीमच्या छाप्यात संशयिताला अटक केल्याची बातमी समोर आली आहे.
सीमा भागातून भारतात कारवायाचा प्रयत्न
उमर हलमंडी नावाच्या हँडलरला भारतात दहशतवादी कारवायांचे निर्देश देण्यात आले होते. उमर हलमंडी हा पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागातून दहशतवादी कारवाया चालवित आहे. हलमंडी यांच्यामार्फत भारतात दहशतवाद्यांची भरती आणि कट्टरपंथीकरण करण्याचे काम केले जात होते. लखनौमध्ये काही जिहादी लोकांना ओळखून त्यांची नेमणूक करून त्यांनी अल कायदा मॉड्यूलची स्थापना केली. या नेटवर्कच्या मुख्य कार्यकर्त्यांमध्ये मिन्हाज, मसरुद्दीन आणि शकील यांची नावे समोर आल्याची माहिती, उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.