कोलकाता : केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (Alapan Bandyopadhyay) यांच्या बदलीवरून वाद सुरूच आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली आहे. मंगळवारपासून अलपन बंडोपाध्याय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम सुरू करतील. त्याचबरोबर मुख्य सचिव पदाची जबाबदारी हरिकृष्ण द्विवेदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (Alapan Bandopadhyay retires as Bengal Chief Secy, appointed as Chief Advisor to Mamata Banerjee)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की, 31 मे पासून अलपन बंडोपाध्याय सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना मी असेच सोडणार नाही. सेवानिवृत्त झाले असले तरी ते दिल्लीला जाणार नाहीत, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. तसेच, त्या पुढे म्हणाल्या की, अलपन बंडोपाध्याय मंगळवार 1 जूनपासून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आलेल्या यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी अर्धा तास उशिरा हजेरी लावल्याची सरकारी सूत्रांची माहिती आहे. तसेच अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या कार्यक्रमात जायचे आहे, असे सांगून निघून गेल्या होत्या. परिणामी केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, आता त्यांची केंद्रात बदली होऊ द्यायची नाही, यासाठी ममता बॅनर्जी यांनी नवी चाल खेळली आहे.
बंडोपाध्याय 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारीअलपन बंडोपाध्याय 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. अलपन बंडोपाध्याय नियमांचे पालन करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वारंवार कौतुक केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्राने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना रिलिव्ह करण्यास सांगितले होते. मात्र या आदेशानंतरही राज्य सरकारने त्यांना रिलिव्ह केले नव्हते.