नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला केंद्र सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी हा संघर्ष सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्याचे मुख्य सचिव आलापन बंदोपाध्याय यांना केंद्राने तडकाफडकी परत बाेलाविले. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामाेडीनंतर अखेर बंदोपाध्याय यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि लगेच ममता बॅनर्जी यांनी त्यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ममतांनी बंदोपाध्याय यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला हाेता. बंदोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करून केंद्राला धक्का दिला आहे. बंदोपाध्याय हे साेमवारी ३१ मे राेजी सेवानिवृत्त हाेणार हाेते. ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ पानी पत्र लिहून मुख्य सचिवांना परत बोलाविण्याचा आदेश बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले हाेते. तसेच बंदोपाध्याय यांना कार्यमुक्त करण्यास ममतांनी स्पष्टपणे नकार दिला हाेता. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ममतांनी म्हटले हाेते, की राज्य सरकार सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. अशा वेळी त्यांना कार्यमुक्त करणे शक्य नाही आणि करणारही नाही.ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना सांगितले, की मुख्य सचिवांची बदली आणि कलईकुंडा येथे आपल्यासोबत झालेल्या बैठकीचा काही संबंध नाही, अशी मला आशा आहे. या बैठकीत मला आपल्यासोबत चर्चा करायची होती. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारची बैठक होत असते. ममतांचे टीकास्त्रकेंद्र सरकारने राज्यासोबत चर्चा करून बंदोपाध्याय कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढविला होता. ममतांनी पत्रकार परिषदेतही या आदेशावरून केंद्र सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय केंद्राला काेणत्याही अधिकाऱ्याला परत बाेलाविण्याचा अधिकार नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. बंदोपाध्याय यांना आम्ही कार्यमुक्त करत नसून ते आज सेवानिवृत्त झाले आहेत. पुढील तीन वर्षे ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहतील, असे ममतांनी सांगितले.
बदलीचे आदेश अन् थेट राजीनामा, बंगालमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिदींचा मोदींना पुन्हा धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 6:42 AM