पुलवामा - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या.
दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारीलाच गुप्तचर संस्थांकडून IED हल्ल्या होण्यासंदर्भात अॅलर्ट जारी केला होता. यासाठी योग्य ती सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. परिसराची योग्य रितीने तपासणी केल्याशिवाय जवानांचा ताफा पुढील मार्गाच्या दिशेने जाऊ देऊ नका, अशी स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. पण, दुर्दैवानं या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या पत्रकात 9 फेब्रुवारीचा दिवस सर्वांधिक धोकादायक असल्याचाही इशारा देण्यात आला होता. विशेषतः पहाटेच्या सुमारास हल्ला होईल, अशी सूचना जारी करण्यात आली होती. पण बर्फवृष्टी आणि दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यावर नेहमीच्या तुलनेत जास्त वाहने आणि जवान पाठविण्यात आले. मार्ग मोकळा केल्यानंतर 14 फेब्रुवारीला सीआरपीएफचे जवान 70हून अधिक वाहनांमधून पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने प्रवास करताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा इशारा दिला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्ल्या घडवण्यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील जारी करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानमधील एका हल्ल्या दाखवला गेला, ज्यामध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करण्यात आला होता.