कोलकाता : बुलबुल या चक्रीवादळाचे दोन दिवसांत अतिगंभीर चक्रीवादळात रूपांतर होऊन ते पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता आहे. या वर्षातील हे पाचवे चक्रीवादळ आहे. त्यामुळे ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आपत्ती निवारण पथकांना सज्ज राहण्यास सांगितले असून, केंद्र सरकारनेही आम्ही सर्व ती मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.गुरुवारी रात्री चक्रीवादळाची तीव्रता वाढेल. शनिवारी ते अतिगंभीर होऊ शकते. यामुळे समुद्राची स्थिती प्रतिकूल होऊ शकते. त्यामुळे मच्छीमारांनी या काळात समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारी भागात शुक्रवारी हवेचा वेग ताशी ५० कि. मी. असेल.
‘महा’चा जोर ओसरतोय, ‘बुलबुल’ जोर धरतेयमुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या ‘महा’ या चक्रीवादळाचा जोर ओसरत असतानाच दुसरीकडे बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल’ नावाचे चक्रीवादळ उठले आहे. आणि हे कमी म्हणून की काय आता विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘पवन’ नावाचे चक्रीवादळ जोर धरणार आहे; दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाने मात्र ‘पवन’ या चक्रीवादळाच्या वृत्तास अद्यापही दुजोरा दिलेला नाही.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, एकीकडे पूर्व-मध्य व लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावरील ‘महा’ या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. दुसरीकडे पूर्व-मध्य व लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर ‘बुलबुल’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून ते जोर धरत आहेत. तिसरीकडे बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले तर मात्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ निर्माण झाल्यास ‘पवन’ हे नाव दिले जाईल.‘पवन’ हे नाव श्रीलंकेने सुचविले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कोणत्याही यंत्रणेवर यासंदर्भातील हालचाली नोंदविण्यात न आल्याने त्यांनी ‘पवन’ या चक्रीवादळाच्या वृत्तास दुजोरा दिलेला नाही.बुलबुल : सातवे चक्रीवादळबंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे अखेरीस गुरुवारी सकाळी बुलबुल चक्रीवादळ झाले. हे हंगामातील सातवे चक्रीवादळ आहे. तर मान्सूननंतरच्या मोसमात बंगालच्या उपसागरातील पहिले आहे.मुंबई राहणार ढगाळ८ नोव्हेंबर : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल९ नोव्हेंबर : आकाश अंशत: ढगाळ राहील.राज्यासाठी अंदाज८ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.९ आणि १० नोव्हेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.