अलिगढ : मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अलिगड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अलिगढ शहरातच प्रखर विरोध करण्यात येत आहे. तथापि, या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताचे जिल्हा प्रशासनाने खंडन केले आहे. अधिकृतरीत्या बंदी नसताना चित्रपटगृहांनी तो प्रदर्शित न करता बंदी घालणे घटनाबाह्य असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी स्पष्ट केले.अलिगढ मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी व अन्य संघटनांसह अलिगढच्या महापौरांनीही या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट समलिंगी संबंध ठेवल्याबद्दल २०१० मध्ये बडतर्फ करण्यात आलेले अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरास यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या नावाने व कथानकाने अलिगढ शहराची विकृत प्रतिमा समाजापुढे सादर होत असल्याचे या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘या चित्रपटाला कुणाचा विरोध असल्याची आम्हाला माहिती नाही आणि सुरक्षा प्रदान करण्याबाबत एकाही चित्रपटगृहाच्या मालकाने आमच्याशी संपर्क साधलेला नाही,’ असे पोलीस अधीक्षक जे. रवींद्र गौर यांनी म्हटले आहे. ‘अलिगड’ चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याच्या मीडियात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना गौर बोलत होते.तथापि, भाजपच्या महापौर शकुंतला भारती यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रखर विरोध केला आहे. आपण सोमवारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. शहराच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे या शहराचे नाव खराब होईल, असे त्या म्हणाल्या. अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेली नसली तरी फारच थोड्या चित्रपटगृहांमधून हा चित्रपट दाखविण्यात येत आहे आणि त्यातही प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरविली आहे. (वृत्तसंस्था)
अलिगढमध्ये ‘अलिगड’ला विरोध; पण बंदी नाही!
By admin | Published: February 29, 2016 3:09 AM