नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबुद्ध संमेलनामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य अधिक बळकट झालं आहे. अनेक मुस्लीम नागरिक या संमेलनाला गेले होते. आता मुस्लीम समाजातील लोकांनाही कळू लागलं आहे की भगवान श्रीराम हेच पैगंबर होते", असं रुबी खान म्हणाल्या. तसंच सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी प्रबुद्ध संमेलनात मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री रामचे नारे दिले, असंही त्या म्हणाल्या.
"देशात कोणताच भेदभाव नाही आणि सर्वच जण एक आहेत असं इथल्या काहींना आता कळालं आहे. हा हिंदुस्तान आहे आणि इथं सर्वांना मिळूनमिसळून राहायला हवं. देशाचं नाव असंच पुढे जात राहिलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी कट्टरपथींच्या निशाण्यावर मी नेहमीच राहिली आहे. पण मी त्यांना कधीच घाबरणार नाही", असं रुबी खान म्हणाल्या.
भगवान आणि अल्लाहला मी मानते आणि यापुढेही असाच नमाज व पूजा अर्चा करत राहीन असंही त्या म्हणाल्या. याआधीही माझ्याविरोधात फतवे जारी केले गेले आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही होऊ शकतं. याची लेखी तक्रारही मी दिली आहे असं असतानाही कुटुंबीयांना आजवर कोणतीही सुरक्षा दिली गेलेली नाही, असं रुबी खान म्हणाल्या.