रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे एका सामान्य प्रवाशाचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. कोचमध्ये सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार झाल्याचं समोर आले. या दुर्घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रेल्वेतील इतर प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली. अलीगड जिल्ह्यातील सोमनाथ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर हा प्रकार घडला होता. दरम्यान, यानंतर रेल्वेने मृताच्या कुटुंबीयांना १५ हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. परंतु मृताच्या कुटुंबीयांनी ते नाकारलं. आपल्याला १ कोटी रुपये आणि सरकारी नोकरी दिली जावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
“आपला मुलगा हरकेश दुबे दिल्लीहून सुल्तानपूर नीलांचल एक्स्प्रेसनं जात होता. तेव्हाच लोखंडी रॉड काच फोडून ट्रेनमध्ये गेला आणि हरकेशच्या मानेच्या आरपार गेला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला,” असं त्याचे वडील संतराम दुबे म्हणाले.
घटनेची सूचना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलेल्या जीआरपी आणि आरपीएफने पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसंच त्याची सूचना कुटुंबीयांना देण्यात आली. या माहितीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय शनिवारी अलीगढ येथे पोहोचले. यावेळी नुकसान भरपाईवरून अधिकारी आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.
“हरकेशची दोन लहान मुलं आहेत. घरात कमावणारं आणखी कोणी नाही,” असं संतराम दुबे यांनी सांगितलं. हरकेशच्या कुटुंबीयांनी रेल्वेकडून १ कोटी रूपये नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. तर रेल्वेनं तच्यांना १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं सांगितलं होतं. परंतु मृताच्या कुटुंबीयांनी तो नाकारला. तसंच आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.