नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल तर कोणीही तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही हे सांगणारी घटना आता घडली आहे. माफियांनी हल्ला केला, शरीरावर 7 गोळ्यांचे घाव, एक डोळा गमावला पण त्यांनी हार नाही मानली, जिद्दीने UPSC क्रॅक केली.
अलीगडच्या डोरी नगरचे रहिवाशी रिंकू सिंह राही यांनी अनेक अडचणींवर मात करत युपीएससीचं स्वप्न साकार केलं आहे. समाज कल्याण विभागात अधिकारी असलेल्या रिंकू सिंह यांनी 13 प्रयत्नानंतर युपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांना 683 वा रँक मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगडमधील डोरी नगरचे रहिवासी असलेले रिंकू राही 2004 च्या बॅचचे पीसीएस अधिकारी असून हापुडी येथील समाज कल्याण विभागात अधिकारी आहेत. समाज कल्याण विभागात काम करत असतानाच त्यांनी युपीएससीची तयारीही सुरू ठेवली.
रिंकू सिंह यांनी 13 वेळा प्रयत्न केल्यानंतर युपीएससी 683 रँक मिळाली आहे. आता रिंकू सिंह पीसीएसहून आयएएस अधिकारी झाले आहेत. 2004 मध्ये रिंकू सिंह यांनी पीसीएस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुझफ्फरनगर येथे झाली होती. तिथे एका भ्रष्टाचार प्रकरणातील चौकशी ते करत होते. त्याचदरम्यान 2008 मध्ये त्यांच्यावर राहत्या घरी जीवघेणा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाली. जवळपास चार महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले. जीवघेण्या हल्ल्यानंतरही रिंकू सिंह घाबरले नाहीत. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आपली मोहीम कायम ठेवली. आपलं काम देखील सुरूच ठेवलं. त्यानंतर आता रिंकू सिंह यांना UPSC मध्ये घवघवीत यश मिळालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.