नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. कार चालकाने हेल्मेट घातलं नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी (Aligarh Traffic Police) 1000 रुपयांची पावती फाडल्याची अजब घटना समोर आली आहे. दंडाची रक्कम पाहून चालकाला धक्काच बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शिक्षण अधिकाऱ्याशी संलग्न असणाऱ्या एका कारला हा दंड आकारण्यात आला आहे. आपण ज्या गाडीची पावती फाडली आहे, ती बाईक नसून कार आहे ही बाब लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सारवासारव केली आहे.
उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये ही घटना घडली आहे. अलीगड वाहतूक एसपी सतिश चंद्र (SP Traffic Satish Chandra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-चलनापासून वाचण्यासाठी लोकं चुकीच्या नंबर प्लेटचा (fake number plates) वापर करत आहेत. ज्यामुळे हेल्मेट परिधान न केल्याच्या गुन्ह्यात एका कार चालकाला पावती फाडण्यात आली आहे. सध्या शहरात बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच दोषींकडून 5000 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
अलीगढचे एसपी ट्रॅफिक सतिश चंद्र यांनी शहरात अनेक ठिकाणी मॅन्युअल पावती फाडण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो काढून त्यांना चलन पाठवत आहेत. पण शहरातील बरेच लोकं ई-चलनापासून वाचण्यासाठी नंबर प्लेटमध्ये छेडछाड करत आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. ज्या कारची पावती फाडली आहे. त्या गाडीचा नंबर एका मोटारसायकला लावण्यात आला आहे. त्यामुळे ही चूक झाली आहे असं म्हटलं आहे.
आमच्याकडे अशाप्रकारच्या घटना जेव्हा येतात तेव्हा एक अर्ज दिल्यानंतर कारवाई मागे घेतली जाते असं देखील सतिश चंद्र यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी हेल्मेट न घातल्यामुळे संबंधित कार चालकाला 1000 रुपयांची पावती फाडल्याचं प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आले आहे. अशा प्रकारच्या घटना याआधीही घडल्या आहेत. त्यामुळे सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.