मध्य प्रदेशातील लोक गुजरातमधून भरताहेत पेट्रोल; लागल्या भल्या मोठ्या रांगा, 'हे' आहे नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 07:07 PM2022-05-22T19:07:54+5:302022-05-22T19:13:41+5:30
गुजरातमधील पेट्रोल पंपावर मध्य प्रदेशातील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, काही लोक ड्रममध्ये भरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणत आहेत.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. मध्य प्रदेशला पाहिजे तसा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशातील अलीराजपूरचे लोक गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील देवहाट गावातून पेट्रोल आणि डिझेल भरत आहेत. अलीराजपूरमध्ये दर कमी झाल्यानंतर पेट्रोल 110.51 रुपये आणि डिझेल 95.62 रुपये आहे. तर गुजरातमध्ये पेट्रोल 97.42 रुपये आणि डिझेल 93.10 रुपये आहे. म्हणजेच, पेट्रोलमध्ये 13 रुपये आणि डिझेलमध्ये 2 रुपयांचा फरक आहे.
अलीराजपूर जिल्ह्यातून गुजरातकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच वाहनांना तेथूनच पेट्रोल भरलं जात आहे. गुजरातमधील पेट्रोल पंपावर मध्य प्रदेशातील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, काही लोक ड्रममध्ये भरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणत आहेत. गुजरातमधील पेट्रोल पंपावरील किमतीत मोठी तफावत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मध्य प्रदेश सरकारनेही व्हॅट कर कमी केला तर ते तिथे पेट्रोल-डिझेल भरतील, असं ते म्हणाले. केंद्र सरकारने कपात केल्यानंतर मध्य प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
रविवारी राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलचा दर 108.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.90 रुपये प्रति लिटरवर पोहोचला. तसेच, इंदूरमध्ये पेट्रोल 108.68 रुपये, डिझेल 93.96 रुपयांवर पोहोचलं आहे. ग्वाल्हेरमध्ये पेट्रोल 108.54 रुपये, डिझेल 93.80 रुपये, पेट्रोल 108.26 रुपये, सागरमध्ये डिझेल 93.54 रुपये आणि रतलाममध्ये 108.43 रुपये आणि डिझेल 93.72 रुपयांवर पोहोचले आहे. जबलपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 108 रुपये आणि डिझेलचा दर 93 रुपयांवर आला आहे. येथे तब्बल 47 दिवसांनंतर महागाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होताहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर बाबी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. पण दर कमी झाल्याने नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.