पंचायत निवडणुकीआधी तीन महिलांसोबत केलं लग्न, निकालात दोन पत्नी निवडूनही आल्या!; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:38 PM2022-07-21T17:38:02+5:302022-07-21T17:39:43+5:30
मध्य प्रदेशचे पंचायत निवडणुकीचे निकाल लक्षवेधी राहिलेले आहेत. यात अलीराजपूर येथील निकालाचीही जोरदार चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे.
अलीराजपूर-
मध्य प्रदेशचे पंचायत निवडणुकीचे निकाल लक्षवेधी राहिलेले आहेत. यात अलीराजपूर येथील निकालाचीही जोरदार चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे. एका व्यक्तीनं पंचायत निवडणूक मतदानाआधी एकाच मंडपात तीन महिलांसोबत विवाह केला. निकालानंतर त्यातील दोन पत्नी निवडून देखील आल्या आहेत.
अलीराजपूरपासून जवळपास १४ किमी दूर असलेल्या नानपूर गावात राहणाऱ्या समरथ सिंह मोर्याची ही आश्चर्यकारक कहाणी आहे. याच वर्षी ३० एप्रिलला सार्वजनिक कार्यक्रमात त्यानं सकरी (२५), मेला (२८) आणि नानी बाई (३०) यांच्याशी एकाच मंडपात विवाह केला. पंचायत निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी तीनपैकी दोन पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि दोन्ही पत्नी विजयी झाल्या आहेत.
विजयानंतर समरथ सिंह यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत गावात घरोघरी जाऊन मतदारांचे आभार देखील व्यक्त केले. तसंच ज्येष्ठांचे आशिवार्द देखील घेतले. समरथ मोर्या नानपुरचे सरपंच आहेत. त्यांचं कुटुंब जनतेच्या सुख-दु:खात नेहमी सोबत राहिल असं आश्वासन त्यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर समरथ यांना पाठिंबा मिळाला. यावेळी पंचायत निवडणुकीत जागा महिला उमेदवारासाठी रिझर्व्ह झाल्यानंतर त्यांनी सकरी बाई म्हणजेच आपल्या पत्नीला सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. तर दुसरी पत्नी मेला बाई हिला वॉर्ड क्रमांक-१४ मधून पंचायत सदस्य पदासाठी उभं केलं.
"मी २००२-०३ सालापासून राजकारणात आहे. २०१० मध्ये मी सरपंच झालो आणि त्यानंतर उपसरपंच देखील झालो. २०१५ साली पुन्हा सरपंच बनलो. आता २०२२ मध्ये माझ्या दोन पत्नी निवडणूक जिंकल्या आहेत. तिसरी पत्नी शिक्षण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्यामुळे ती निवडणुकीला उभी राहू शकली नाही", असं समरथ सिंह यांनी सांगितलं.
एकाचवेळी तीन लग्न कशी केली?
एकाच वेळी तीन महिलांशी लग्न करण्यामागे देखील एक खास कारण आहे. आदिवासी भिलाला समुदायात लिव्ह-इनमध्ये राहणं आणि संतती प्राप्तीची सूट आहे. जोवर विधीवत लग्न लावलं जात नाही तोवर लग्न झालं असं मानलं जात नाही. तोवर सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावण्यासाठी परवानगी देखील दिली जात नाही. त्यामुळेच सहा मुलं असतानाही समरथ मोर्या यांनी तीन लिव्ह-इन प्रेयसींसोबत लग्न केलं होतं.
आता तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीनं लग्न करणं भारतीय कायद्यात बसतं का? तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-३४२ अनुसार आदिवासी रिती-रिवाज आणि विशिष्ट सामाजिक परंपरांच्या संरक्षण दिलं जातं. त्यामुळे या अनुच्छेदानुसार समरथ याचं एकाचवेळी तीन जणींसोबत लग्न अवैध मानलं जात नाही.