नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी अरविंद केजरीवालांचे कौतुक केले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केल्यामुळे काँग्रेसमधील नेते ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी रात्री उशीरा अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर काँग्रेसचे दिल्लीतील नेते अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली आहे. तसेच, तुम्हाला काँग्रेस पक्ष सोडायचा असेल तर खुशाल सोडा, असा सल्लाही अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांना दिला आहे. त्यानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनीही मिलिंद देवरा यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे.
अलका लांबा यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. तुम्ही वडिलांच्या नावावर पक्षात आलात. नंतर आयतेच तिकीट मिळाले. काँग्रेसच्या लाटेत निवडून आलात आणि पहिल्यांदाच मंत्री झालात. ज्यावेळी स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली, त्यावेळी पराभव झाला. पक्षात पदासाठी संघर्ष करा. त्यानंतर पक्षाला शिव्या देत दुसऱ्यांचे गुणगान करत गिटार वाजवा, असे अलका लांबा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मिलिंद देवरा यांनी अरविंद केजरीवाल यांचा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निधी दुप्पट करून दाखविल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दिल्ली आता आर्थिक क्षेत्रात सक्षम होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
(केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला)