मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित कंत्राटं नियमानुसारच देण्यात आल्याचा खुलासा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एनएचएसआरसीएल) केला आहे. भाजपाला देणग्या देणाऱ्या कंत्राटदारांना आणि कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित कामांची कंत्राटं देण्यात आल्याचं वृत्त काही वृत्त संकेतस्थळांनी दिलं होतं. यानंतर एनएचएसआरसीएलनं स्पष्टीकरण दिलं आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अतिशय पारदर्शकपणे निविदा मंजूर करण्यात आल्या. या प्रक्रियेला सेंट्रल पब्लिक प्रोकरमेंट पोर्टल / एनएचएसआरसीएल संकेतस्थळ / वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. सर्वात कमी किमतीच्या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांनाच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाशी संबंधित कामांची कंत्राटं देण्यात आली, असा खुलासा एनएचएसआरसीएलनं केला आहे. गुजरातस्थित क्युब कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीला बडोदा स्थानक परिसरात कम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सिस्टम कॉम्प्लेक्ससाठी भाडेतत्त्वावर जमीन देण्यात आली. मात्र या कंपनीसोबतच आणखी चार कंपन्यांनीदेखील निविदा भरल्या होत्या अशी माहिती एनएचएसआरसीएलकडून देण्यात आली आहे. बुलेट ट्रेनशी संबंधित विविध इमारतींच्या उभारणीचं कंत्राट के. आर. सावनी नावाच्या कंत्राटदाराला मिळालं आहे. सावनी बडोदा स्थानकाच्या आसपास इमारतींची उभारणी करणार आहेत. मात्र सावनी यांच्यासोबच आणखी तीन कंत्राटदारांनीदेखील निविदा भरली होती, असं एनएचएसआरसीएलनं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत वाटवा ते साबरमती दरम्यान विविध कामांचं कंत्राट धनजी के. पटेल या कंत्राटदाराला मिळालं आहे. याबद्दलही एनएचएसआरसीएलनं खुलासा केला आहे. याच कामासाठी पटेल यांच्यासोबतच आणखी दोन कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या, अशी माहिती एनएचएसआरसीएलनं दिली आहे.
बुलेट ट्रेनच्या सर्व कंत्राटांचं वाटप नियमानुसारच; एनएचएसआरसीएलचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 3:51 PM