नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बैठक घेणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याशी ही पहिलीच बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर कोण राहणार? यावर सध्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासोबत राहुल गांधी बैठक घेणार आहेत.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची झालेली नामुष्की तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊनही काँग्रेसची सत्ता असलेल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री, महासचिव, प्रभारी आणि वरिष्ठ नेते पद सोडायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही, अशा शब्दांमध्ये युवक काँग्रेसच्या बैठकीत त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खळबळ माजली होती.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 25 मे रोजी राहुल यांनी काँग्रेस कार्यकारणीची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. मात्र त्यावर कार्यकारणीने तो राजीनामा स्वीकारला नाही. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही राज्यात सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुका असणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील नेत्यांचीही यात बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीशी समझोता करण्याचा आग्रह धरला होता. येत्या ३ जुलैपासून माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील ‘वंचित’च्या नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करतील. समाधानकारक प्रस्ताव देऊन आघाडी करा, असे निर्देश राहुल गांधी यांनी दिले आहेत.