नवी दिल्ली : कोरोना महामारीला दोन वर्षे तोंड देत निर्बंधांना सहन केलेल्या नागरिकांना आता ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त वातावरण लाभणार आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशातून कोरोनाशी संबंधित निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी मास्क आणि सामाजिक अंतर राखणे अनिवार्य असेल. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्राच्या या निर्णयाची माहिती दिली.पत्रात म्हटले की, मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा आपत्तीव्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत कोरोना रोखण्यासाठी दिशा-निर्देश जारी केले होते. कोरोनाच्या साथीने जसजसे स्वरूप धारण केले त्याप्रमाणे निर्बंधांमध्ये बदलही केले.गेल्या २४ महिन्यांत कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात आले. त्यात कोरोना स्क्रीनिंग, मॉनिटरिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरण, रुग्णालयात दाखल करणे आणि सामान्य जनतेत जागरुकता आदींचा समावेश होता.नवे रुग्ण, मृत्यूंमध्ये घटया उपायांचा परिणाम म्हणून गेल्या ७ आठवड्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये तसेच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूतही वेगाने घट झाली. देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १,७७८ रुग्ण आढळले, तर ६२ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या २४ तासांत ८२६ ने कमी होऊन २३,०८७ झाली आहे.एकत्रित प्रयत्नांतून प्रभावी लसीकरण १८१.८९कोटी आतापर्यंत लसीच्या मात्रा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या देशव्यापी मोहिमेत दिल्या.लसीकरणात केंद्र आणि राज्यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा उल्लेख भल्ला यांनी पत्रात केला आहे. दैनिक कोरोना संक्रमणाचा दरही ०.२८ टक्के आहे. केंद्रीय गृह मंत्रालय ३१ मार्चनंतर कोणताही नवा आदेश जारी करणार नसल्याचेही पत्रात म्हटले आहे.राज्यांनी उभारली स्वत:ची सक्षम यंत्रणाकोरोना महामारी आणि निर्बंधांचा अनुभव घेतल्यामुळे देशात लोकांमधील विषाणूची भीती कमी झाली आहे. शिवाय निर्बंध मागे घेतल्याने प्रशासनाकडून नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील प्रशासनाने महामारीला तोंड देण्याची स्वत:ची सक्षम यंत्रणा उभारली आहे, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात दिवसभरात १४९ रुग्ण मुंबई : राज्यात बुधवारी १४९ नवीन रुग्णांचे निदान आणि २ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ७७,२३,९५९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात १,०८४ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९०,६८,३१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.९६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७२,८१७ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ७६९ झाला आहे.
निर्बंधमुक्त भारत! ३१ मार्चनंतर कोणताही नवा आदेश नाही; केंद्र सरकारचं राज्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 6:33 AM