पवन देशपांडे
मुंबई, दि. १७ : एखाद्या घराण्याची आपल्या राज्याविषयी खूपच ‘निष्ठा’ असते़ त्याच निष्ठेतून मग ते अख्खं घराणं राज्याची ‘सेवा’ करण्यात स्वत:ला इतकं डुंबवून घेतं की इतर कोणाच्या हाती काही गेलं की या घराण्याचा तीळपापड होतो़ राज्याला हवं नको ते सारं आपल्याच घरातून व्हावं, याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर हे घराणं दक्ष असतं. असंच एक राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि घराणं आहे यादवांचं. मुलायमसिंह त्यांचे नेते़ त्यांना प्रेमानं, आदरानं ‘नेताजी’ म्हटलं जातं. अर्थात त्यांच्या समाजवादी पार्टीमध्ये. या नेताजींच्या घराण्यातले सारेच नेते आहेत़
मुलगा, सून, भाऊ, त्यांची मुलं, पत्नी, मेव्हणे... सारेच सत्तेतल्या वेगवेगळ्या गाद्यांवर विराजमाऩ एकाच खानदानातल्या वेलीच्या सर्व फांद्यांना सत्तेची फळं/फुलं लगडलेली दिसतात़ आत्ता-आत्ता राजकारण करू लागलेल्या नव्या रक्तापासून पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेताजींपर्यंत साऱ्यांनी आपलं आपलं सिंहासन पक्कं केलंय. जणू राज्य, राज्याचं राजकारण आपल्याच घराण्याच्या मालकीचं. चार वर्ष होऊन गेली राज्याचं राजकारण गुंडगिरी, दंगे यांच्यासाठीच ओळखलं जातंय, याचं साधं भानही त्यांना आलं नाही़ आधीच्या सरकारचा मायावी हत्ती उधळला होता आणि त्यामुळे कंटाळलेल्या सपाच्या हाती कमान सोपवली़ पण जनेतच्या पदरी काहीच पडलं नाही. अर्थव्यवस्थेला घरघर लागली़ तिजोरीच्या चाव्या असलेलं घराणं घरगुती राजकारणातून बाहेर पडलं नाही़ महाराष्ट्रातील काका-पुतण्यांच्या वादाच्या कहाण्या कमी पडल्या की काय म्हणून इथंही काका-पुतण्याचा वाद चावडीवर आलाय.
सुपुत्र अखिलेश यादव यांचा वारू मुख्यमंत्री झाल्यापासून उधळलेला़ त्यांना थांबवण्यासाठी पिताश्रींना लगाम खेचावी लागतेय. कारण आता पक्षाला भगदाड पडेल की काय अशी शंका पिताश्रींना आलीय़ एखादा छोटा पक्ष आपल्यात विलीन करायचा की नाही यावरून अखिलेश आणि बड्या खात्यांचे मंत्री व काका शिवपाल यांच्यात मतभेद झाले़ अखिलेशना काकांची पक्षातील ‘जागा’ खटकू लागली. पण, पिताश्रींनी पुत्राच्या पुढच्या खेळी ओळखल्या आणि सुपुत्रांकडून प्रदेशाध्यक्षपद काढून शिवपालकडे सोपवलं. सुपुत्र संतापले. त्यांची प्रतिक्रियाही बापाच्या लाडक्या पोरासारखीच उमटली. काकांबद्दलची खदखद एवढ्या टोकाला पोहोचली की त्यांनी काकांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला़ झालं, ही खेळी सुपुत्रांच्या अंगाशी आली. त्यांना पित्राश्रींच्या नाराजीला सामोरं जावं लागलं.
शिवाय पक्षातही नाक कापलं गेलं. कारण नेताजी मुलाऐवजी भावाच्या बाजूनं उभे राहिले़ या भावाची कड घेण्याची नेताजींची पहिली वेळ नाही़ यापूर्वीही त्यांनी स्वातंत्र्य दिनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अखिलेश सरकारचे वाभाडे काढून शिवपाल नसतील तर पक्ष कसा कोसळेल याचं उदाहरण दिलं होतं. तेव्हाच सुपुत्राने वाऱ्याची दिशा समजून घ्यायला हवी होती़ कारण शिवपाल यांचं राज्य आणि पक्षातलं महत्त्व नेताजी जाणून आहेत. पाच महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असताना त्यांना दुखावणं परवडणारंही नाही. त्यामुळेच सपुताकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याची हिंमत पिताश्रींनी यांनी केली़ पोरानं आतापर्यंत जी माती खाल्ली ती मागे सारून निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करायचे असेल तर शिवपाला हाताशी धरावं लागेल, हे नेताजींनी हेरलं.त्यामुळंच त्यांनी पक्षाची राज्यातली धुरा शिवपाल यांच्याकडं सोपवली.
एकीकडे आझम खानसारखा राजकारणी आणि पुन्हा पक्षाच्या दारात असलेले अमरसिंह तर दुसरीकडे दलितांच्या कैवारी म्हणवून घेणाऱ्या मायावती अशा साऱ्यांना काबूत ठेवून उत्तर प्रदेश जिंकायचं असेल तर शिवपालसारखा खमका नेता नेताजींना नेतृत्वासाठी हवा होता़ अखिलेश मुख्यमंत्री झाल्यापासून सेलीब्रिटी थाटात तर शिवपाल गावोगाव फिरून कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत़ प्रत्येक जिल्हाध्यक्षाशी चांगले संबंध आहेत. मुस्लीम आणि यादवांमध्येही चांगली प्रतिमा आहे़ अनेक दशकांपासून ते नेताजींना साथ देत आहेत. पक्षाशी निष्ठा आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला त्यांचा आदरयुक्त दबदबा नेताजींच्या पक्षाला आगामी निवडणुकीत कामी येणार आहे़ निवडणुकीच्या राजकारणात अखिलेशसारखे ‘पोस्टर बॉय’ कामी येत नाहीत़ शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोच असणारा नेता लागतो़ तो नेता शिवपाल असल्यानेच मुलाकडचं पद नेताजींना भावाला दिलं.
ही खेळी राज्यात वेगवेगळी सिंहासनं सांभाळण्यात मग्न असणाऱ्या यादव घराण्यातील वादाला चव्हाट्यावर आणणारी ठरली असली तरी निवडणुकीसाठी कदाचित फायद्याची ठरेल, अशी नेताजींना आशा असावी़ त्यामुळंच पक्षातला वाद घराण्याची इभ्रत घालवत असतानाही शिवपाल यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपद व मंत्रिपदाचा राजीनामा नेताजींना फेटाळावा लागला. सारं आलबेल असल्याचं जाहीर करावं लागलं. मंत्रिमंडळातून हाकललेल्यांना परत मंत्रिमंडळात घेतलं जाईल, अशी ग्वाही नेताजींना द्यावी लागली. घराण्यातला यादवी घेऊन निवडणुकीला सामोरं जाणं यादवांना परवडणारं नाही़ अन्यथा, घराण्याची झालेली ‘अखिल नाचक्की’ येत्या निवडणुकीत सारंच बुडवून टाकेल़