लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज भारतीय स्टेट बँकेने विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांंशी संबंधित सर्व माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर काही तासातच निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली. हा संपूर्ण तपशील उपलब्ध झाल्यामुळे आता कोणत्या देणगीदाराने कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या तारखेला किती निवडणूक निधी दिला हे उघड झाले आहे.
निवडणूक आयोगाने दोन भागांमध्ये १२ एप्रिल २०१९ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांविषयीची ४४ हजार ४३४ डेटा संचांमध्ये असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे.
स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र
- निवडणूक रोख्यांंशी संबंधित संपूर्ण तपशील भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे प्रतिज्ञापत्र स्टेट बँकेच्या अध्यक्षांच्या वतीने आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले.
- आयोगाला दिलेल्या माहितीत निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्याचे नाव, रोखे वटविणाऱ्या राजकीय पक्षाचे नाव, रकमेचा तपशील, रोख्यांचा अल्फा-न्यूमेरिक क्रमांक, रोखे जारी करणाऱ्या आणि वटविणाऱ्या स्टेट बँकेच्या शाखांचे क्रमांक, खरेदीच्या व वटविल्याच्या तारखा दिल्या आहेत.
- त्याशिवाय यूआरएन क्रमांक, रोख्याची स्थिती, कालबाह्य होण्याची तारीख, पक्षाच्या बँक खात्याचे शेवटचे चार क्रमांक आदी माहिती देण्यात आली.